बाई….माणूस म्हणून | Mumbai local travel experience in Marathi

मैत्रिणींनो , लोकल ही मुंबईची लाईफ लाईनच. आपलं सर्वांच आयुष्य घड्याळाबरोबरच लोकल वरही चालतं. अनेक बरे वाईट अनुभव घेऊन आपण पळत असतो लोकल बरोबर दररोज. सुट्टीच्या दिवशी तर चुकल्या चुकल्या सारख वाटतं हो ना ? अनेक ग्रुप बनतात. अनेक आठवणी गुंफल्या जातात. गप्पांचे फड जमतात. सुख दुःखाची वाटणी होते. तर हे सगळं म्हणजे जणू आपल्या आयुष्याचा एक भागच बनला आहे.

पण या लोकलच्या गर्दीत आपली एखादी मैत्रीण हरवली तर ? परत कधीही न भेटण्यासाठी. कल्पना पण अंगावर सर्रकन काटा आणते ना? मग या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे असं नाही का वाटत? अहो काय होतं ना , आपण आपल्या व्यस्त ,दैनंदिन जीवनात कधी कधी इतक्या रममाण होतो ना की आजूबाजूला काय चाललंय याकडे साधं लक्ष ही देत नाही.आपण आपली ७:५५ ची लोकल धावत पळत पकडतो. आपला ग्रुप आपली वाटच पहात असतो. वाट काढत आपण आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो.त्यांच्या जवळ पोहचलो की आपल्याला हुश्श वाटतं.

मुंबई ही सगळ्यांनाच सामावून घेते. इथे अनेक लोक येत असतात दररोज. गावा कडून येणाऱ्या लोकांची फार गैरसोय होते कधी कधी. त्यांना गाड्यांविषयी फारशी माहिती नसते. असंच कधीतरी एखादा अनोळखी जीव आपल्या जीवाची धडपड करत चढतो लोकल मध्ये. ज्याला नीटसं उभं राहणं ही अवघड होऊन जातं. आपला आणि सोबतच आपल्या सामानाचा तोल सांभाळत उभी असते अशी एखादी व्यक्ती. तिला बसायला जागा देणं तर दूरच तीचा चुकून लागलेला धक्का ही खपवून घेत नाही आपण. आणि मग सो कोल्ड सुशिक्षित आपण सुरुवात करतो भांडणाला.

हे असे रोजचे अनुभव असतात. पण मैत्रिणींनो , बाई तर आहोतच पण माणूस त्या आधी आहोत ना ? संपत चालली आहे का माणुसकी आपल्या मधली ? सांगावस एवढंच वाटतं की समजून घ्यायला शिकूया ना थोडंस. संसारात , नात्यात, नोकरीत जसा समजूतदारपणा दाखवतो कधी कधी तसाच समजूतदारपणा दाखवूया ना जरा प्रवासात ही.

हे असंच सगळीकडे घडत असतं असं काही नाही. चांगले अनुभव ही येत असतात. पण जर हे असं काही चुकीचं घडत असेल तर मात्र हे कुठेतरी थांबायला हवं असं नाही का वाटतं?

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment