एक ज्योतिषी बाजारात बसून लोकांचे भविष्य सांगत असे. त्याचा धंदा अगदी छान चालला होता. ज्योतिष ऐकण्यासाठी त्याच्याकडे लोकांची नेहमीच गर्दी असे. त्यातून त्याला पैसाही बरा मिळे. लोकांचा त्याच्या ज्योतिषावर विश्वास होता. त्यामुळे त्याच्याकडील गिर्हाईकही वाढत चालले होते.
एका दिवसाची गोष्ट. तो एका इसमाचे ज्योतिष सांगण्यात गुंतला असतानाच त्याच्या शेजारी त्याच्याकडे धावत आला आणि म्हणाला, ”ज्योतिषीभाऊ, अहो तुमचं घर चोरांनी फोडलं आणि त्यातलं सगळं लुटून नेलं. चला, पळा लवकर.” शेजार्याचे बोलणे ऐकूण घाबरलेल्या ज्योतिषाने आपले सामान लगबगीने गोळा केले आणि तो घरी जायला निघाला. न राहून ज्योतिष विचारायला आलेल्या एका इसमाने त्याला विचारले,
”ज्योतिषीभाऊ, मला तुमचं आश्चर्य वाटतंय्. तुम्ही दुसर्यांच ज्योतिष सांगता आणि ते खरंही असतं. मग तुमच्या घरी चोरी होणार आहे, हे तुम्हाला अगोदर कसं नाही कळलं?”
”अहो कसं कळणार! मी दुसर्यांच ज्योतिष सांगतो त्याबद्दल मला पैसे मिळतात. स्वत:चं ज्योतिष पाहून मला थोडेच पैसे मिळणार होते? म्हणून मी ते पाहिलंच नाही बघा. कधी कधी असंच होतं. आपल्या व्यवसायाचा इतरांना फायदा होतो. मात्र स्वत:च्या कुटुंबाला त्याचा फायदा होत नाही. माझं तसंच झांलय्.”