एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला.
शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.
अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.
हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.
तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.