एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.
अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.
पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य: जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
Nice