धनाचा विनियोग | Marathi Katha


एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता.


कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.


उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.''


हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्‍पर्य - ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.

You May Also Like