Crow And Snake – Marathi Story | कावळा आणि साप मराठी गोष्ट

एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.

दरवेळी असे झाल्याने कावळा-कावळी खूपच दु:खी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा रहात होता. त्या कोल्ह्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.

कावळा कोल्ह्यास म्हणाला, ”दरवेळी आमची पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील.” कोल्हा म्हणाला, ”एखादेवेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही.”

कोल्ह्याने विचार बराच केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली, ”एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेउन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक. ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.”

कावळ्यातला हा उपाय एकदम पटला. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते. कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते.

कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई बिळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला. त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले.

त्यांनतर कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुषीत होते

तात्पर्य: काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची युक्तीच श्रेष्ठ ठरते.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment