Mouse, Cock And Cat Marathi Story | उंदीर, कोंबडा आणि मांजर

एक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच.

रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता.

तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.

आता दुसर्‍या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही.

’ हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.’

तात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.

1 thought on “Mouse, Cock And Cat Marathi Story | उंदीर, कोंबडा आणि मांजर”

Leave a Comment