Murlkhala updesh kela tar | मूर्खाला उपदेश केला तर | Bal Katha in Marathi

एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता. कुडकुडणार्‍या वानराला बघून त्याने म्हटले, ‘अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी आली नसती तुझ्यावर.’

‘माणसासारखे हात-पाय आहेत मला, पण..’ वानर कुरकुरला, पण माणसासारखी कामगिरी आम्हाला कुठली जमायला? आमचे डोके तेवढे नाही काम करत.’

‘त्याचे काय आहे..’ पक्षी बोलला, ‘ज्याचे मन चंचल असते, जो दुसर्‍याच्या कुचेष्टा करण्यात वेळ दवडतो, त्याच्या हातून विधायक स्वरूपाचे काम होत नाही. यासाठीच दुसर्‍याला त्रास देण्याची प्रवृत्ती तू सोडून द्यायला हवीस. मग जिद्दीने, चिकाटीने स्वत:च्या निवार्‍यासाठी घरकुल बांधता येईल तुला.’

उपदेश ऐकायची सवय नसलेल्या वानराला आला वैताग. तो चिडून, दात विचकत बोलला, ‘घरट्यात बसून मारे उपदेश करायला काय जाते तुझे? तू समजतोस कोण स्वत:ला? थांब, माझा इंगाच दाखवतो तुला.’

आणि झरझर झाडावर चढून त्या वानराने पक्ष्याचे घरटेच विस्कटून टाकले. दुष्ट स्वभावाच्या मूर्खाला आपण उपदेश करीत बसलो, म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवला. हे तो पक्षी जाणून चुकला आणि ‘स्वत:चं घर करवत नाही अन् दुसर्‍याने बनवलेले बघवत नाही,’ असे मनाशी म्हणत तो पक्षी दूर उडून गेला.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment